Pune : डॉ. प्रवीण दरक यांना यंदाचा ‘जीपीए ऑफ द इयर’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे दिला जाणारा ‘जीपीए ऑफ द इअर’ पुरस्कार डॉ. प्रवीण दरक यांना प्रदान करण्यात आला. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी इंदिरा आयविएफ चे संचालक डॉ. अमोल लुंकड तसेच  कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर उपस्थित होते.

जीपीए चे सर्वात जेष्ठ चिकित्सक डॉ. विलास टाकणे यांना त्यांच्या यशस्वी कार्यकीर्दी साठी जीपीएच्या अध्यक्षा डॉ. रूपा अगरवाल यांच्या हस्ते ‘जी पी ए सन्मान” पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोरोनाच्या काळात रूग्णसेवेसाठी झटणाऱ्या डॉक्टरांबाबत माझा त्यांच्या प्रति असणारा आदर अजून वाढला असल्याची भावना या वेळी मिश्रा यांनी व्यक्त केली. कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी या वर्षी कोरोना महामारीमुळे वारी रद्द झाली असली तरी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी रुग्ण सेवेतून आपली सेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी जीपीएच्या प्रियदर्शनी या महिला विभागातर्फे डॉ. मानसी पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून बनवलेल्या कोरोनाच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या महिला डॉक्टर्सचे कार्य अधोरेखित करणाऱ्या महितीपटाचे प्रसारण करण्यात आले तसेच असोसिएशनच्या सभासदांना या वर्षा साठीचे विविध पदाधिकारही सोपवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशन चे सचिव डॉ. श्रीराम जोशी यांनी केले. सचिव डॉ. संतोष खेडकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.