Pune : डॉ. संजय कुलकर्णी यांची ‘सोसायटी इंटरनॅशनल डी यूरॉलॉजी’ या जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

गेल्या 100 वर्षांत हे पदग्रहण करणारे डॉ. कुलकर्णी हे दुसरेच भारतीय

एमपीसी न्यूज- पुण्यातील प्रसिद्ध मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांची मूत्रविकारतज्ज्ञांच्या ‘सोसायटी इंटरनॅशनल डी यूरॉलॉजी’ या जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नुकत्याच ग्रीसमधील अथेन्स येथे झालेल्या भव्य समारंभात डॉ. कुलकर्णी यांनी हे पद औपचारिकरित्या ग्रहण केले.

‘सोसायटी इंटरनॅशनल डी यूरॉलॉजी’ या संस्थेचे १३० देशांमध्ये १०,००० हून अधिक सदस्य आहेत. या संस्थेच्या १०० वर्षांच्या इतिहासात डॉ. कुलकर्णी हे संस्थेचे अध्यक्षपद भूषविणारे दुसरेच भारतीय ठरले आहेत. ही निवड एक वर्षासाठी झाली असून ऑक्टोबर २०२० पर्यंत ते हा पदभार सांभाळणार आहेत.

पुरूषांमधील मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रियेत (युरेथ्रोप्लास्टी) डॉ. कुलकर्णी यांचा हातखंडा असून त्यांनी विकसित केलेली शस्त्रक्रिया ‘कुलकर्णीज् टेक्निक ऑफ युरेथ्रल रीकन्स्ट्रक्शन’ या नावाने प्रसिद्ध आहे. गेले वर्षभर त्यांनी ‘सोसायटी इंटरनॅशनल डी यूरॉलॉजी’चे उपाध्यक्षपद भूषविले. ‘युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया’च्या सुवर्णपदकाचे ते 2011 मध्ये मानकरी ठरले. तसेच या संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्षपद डॉ. कुलकर्णी यांनी 2014 मध्ये भूषवले आहे. दोन वर्षांपूर्वी भारतात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा डॉ. बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार देखील डॉ. कुलकर्णी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

डॉ. कुलकर्णी यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९७६ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातीलच केईएम रुग्णालयातून प्रसिद्ध सर्जन डॉ. पी. के. भरूचा यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यतंत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये पाच वर्षे मूत्रविकारांवरील उपचारांचे शिक्षण घेऊन ते मायदेशी परत आले. देशापरदेशातील असंख्य रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या ‘कुलकर्णीज स्कूल ऑफ युरेथ्रल सर्जरी’ या केंद्रात ते मूत्रविकारतज्ज्ञांना शस्त्रक्रियेचे मोफत प्रशिक्षणही देतात. पुण्यात १९९० मध्ये पहिली ‘लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी या त्यांच्या पत्नी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.