Pune : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोणतेही धार्मिक विधी न करता अखेरचा निरोप

एमपीसी न्यूज -ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी दुपारी शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे 21 फैरी झाडून मानववंदना देण्यात आली. यावेळी कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाही.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गिरीश बापट, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेते नाना पाटेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह नाट्य – कलावंत, साहित्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. श्रीराम लागू यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. डॉ. लागू यांचा मुलगा विदेशात असतो. त्याला यायला उशीर झाल्याने शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते.
डॉ. लागू यांनी नटसम्राट, पिंजरा, सिहासन, अशा अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. हिंदी चित्रपटातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या होत्या त्यांच्या निधनाने एक पुणेकर हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. पुणे महापालिकेनेही लागू यांना श्रद्धांजली वाहून आठवणी जागविल्या. त्यांच्या नावाने नवोदित कलावंतांसाठी व्यासपीठ उभारण्याची भावना सर्वपक्षीय नगरसेवकांनी बोलून दाखविली.