Pune : नटसम्राट विसावला ! ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

एमपीसी न्यूज – मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या बळावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू (वय ९२) यांचे मंगळवारी पुण्यात त्यांच्या निवाससथनी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी हिंदी नाट्य चित्रपट क्षेत्रातून एक विचारवंत आणि विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. लागू यांच्या पश्चात पत्नी दीप लागू, मुलगा आनंद लागू आणि चुलतभाऊ उदय लागू असा परिवार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची तब्येत फारशी बरी नव्हती. डॉ. लागू यांचा मुलगा अमेरिकेतून आल्यानंतर गुरुवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कारांनी डॉ. लागू यांना गौरवण्यात आले आहे. भेदक नजर, कोणत्याही भूमिकेत तन्मयतेने शिरण्याची त्यांची शैली यासाठी ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात. पिंजरा, सिंहासन, मुक्ता, सामना, घरोंदा, हे त्यांचे गाजलेले चित्रपट तर नटसम्राट, हिमालयाची सावली, कन्यादान, दुभंग ही त्यांची गाजलेली नाटके होती. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली होती.

अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.