Pune : जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेच्या उपाध्यक्षपदी डॉ. वृषाली भोसले

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील एसएनबीपी संस्था समूहाच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांची प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या स्पर्धा समितीवर उपाध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

राज्यातील वयोगटातील हॉकी स्पर्धा आणि महिला हॉकीला प्रोत्साहन देण्यात त्यांचा पुढाकार, तसेच नेहरु ऑल इंडिया आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या मुख्य पुरस्कर्त्या या नात्याने त्या परिचीत होत्या. यामुळेच या प्रतिष्ठेच्या स्पर्धा समितीच्या उपाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव पुढे आले. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 1964 पासून नेहमीच हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार याला प्राधान्य देण्यात आले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचाही समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीचे सरचिटणीस कुकू वालिया म्हणाले, डॉ. वृषाली भोसले यांचे हॉकी प्रेम वेगळे सांगायची गरज नाही. राष्ट्रीय खेळाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने काम करत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळाच्या प्रसारासाठी काय करण्याची गरज आहे हे त्यांना चांगले माहित आहे. यामुळेच त्या जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीच्या उपाध्यक्षपदासाठी पात्र ठरतात. त्यांनी आमच्या समितीत नुसतेच काम केले नाही, तर विद्यापीठ स्पर्धा पुरस्कृत करून त्यांनी विद्यापीठ पातळीवर हॉकीचा प्रसार केला.

डॉ. वृषाली म्हणाल्या, या निवडीमुळे मला खूप आनंद झाला आहे. मला या पदासाठी जबाबदार समजले यासाठी मी जवाहरलाल नेहरु हॉकी स्पर्धा समितीचे आभार मानते. किशोर, कुमार तसेच राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळाच्या प्रसारासाठी मला नेहमीच जवाहरलाल नेहरु स्पर्धा समितीने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या सर्व आघाड्यांवर हॉकी खेळाचा प्रसार करण्याचा माझा आणि समितीचा एकच दृष्टिकोन आहे. समितीचे उपाध्यक्षपद हा माझा अभिमान आहे.

एका शैक्षणिक संस्थेच्या प्रमुख असतानाही डॉ. वृषाली यांनी आपली खेळाची आवड जपताना हॉकीला आधार देण्याचे काम केले आहे. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर एकमात्र असलेल्या एसएनबीपी मुले आणि मुलींच्या स्पर्धेचा समावेश आहे. त्याचबरोबर शुभद्रा ही जिल्हा स्तरावरील दहा क्रीडा प्रकारातील आंतरशालेय स्पर्धा यांचा समावेश आहे. त्याचबराबर बुद्धिबल, कराटे, फुटबॉल आणि हॉकी या खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे सातत्याने आयोजन करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरेबर अनिवासी हॉकी अकादमी सुरू करून त्यांनी विद्यार्थांना एकाचवेळेस शिक्षण आणि खेळात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.