Pune: जागतिक कर्करोग परिषदेत रसायू कॅन्सर क्लिनिकचे वैद्य योगेश बेंडाळे यांचा शोधनिबंध सादर

कर्करोगाच्या रुग्णांना बद्धकोष्ठतेच्या त्रासातून मुक्तीसाठी आयुर्वेदिक औषध गुणकारी, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकचे संशोधन 'इस्मो' मध्ये प्रसिद्ध 

एमपीसी न्यूज – कर्करोगाच्या रुग्णांना बद्धकोष्ठतेच्या त्रासातून मुक्त करण्यात आयुर्वेदातील गुणकारी औषध प्रभावी ठरते, असे संशोधन पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकने केले आहे. त्याबाबतचा शोधनिबंध ‘युरोपियन सोसायटी ऑफ  मेडिकल ऑन्कोलॉजी (इस्मो) या जागतिक परिषदेत सादर करण्यात आला. 

स्पेनमध्ये ऑनलाईन पद्धतीने नुकतेच पार पडलेल्या 22 व्या जागतिक कर्करोग परिषदेत रसायू कॅन्सर क्लिनिकचे वैद्य योगेश बेंडाळे यांनी हा शोधनिबंध सादर केला. हा शोधनिबंध अ‍ॅनल्स ऑफ ऑन्कोलॉजी या जागतिक स्तरावर अत्यंत नामांकित अशा शोधपत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे.

कर्करोगावर उपचारासाठी दिलेल्या औषधांमधून विशेषतः केमोथेरपीनंतर रुग्णाला बद्धकोष्ठता होते. रुग्णाचे पोट व्यवस्थित नियमित साफ होत नाही. त्यावर आयुर्वेदिक औषध परिणामकारक उपाय करते, तसेच पोटाचा, यकृताचा स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी संबंधित बद्धकोष्ठतेवरही हे औषध गुणकारी ठरत असल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

कर्करुग्णांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता हे तिसऱ्या क्रमांकाचे लक्षण आहे. कर्करोगाचे गुंतागुंत वाढलेल्या रुग्णांचा त्रास यातून वाढतो. कर्करोगाच्या 50 ते 87 टक्के रुग्णांना अशा प्रकारच्या बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. कर्करोगाच्या उपचारात दिलेल्या केमोथेरपीचा दुष्परिणाम म्हणून किंवा रुग्णाच्या वेदना कमी करण्याच्या औषधांमुळेही ही बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते. यावर आतापर्यंत काही औषधे रुग्णांना देण्यात येत होती. मात्र, बद्धकोष्ठतेतून रुग्णाची सुटका होत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे कर्करोगाच्या पुढील उपचारांना उशीर होत. कर्करोगाचा शरीरात होणारा प्रसार थांबविणाऱ्या केमोथेरपीलाही त्यातून मर्यादा पडत. त्याचा थेट परिणाम कर्करोग व्यवस्थापनावर होत असल्याचे स्पष्टपणे कर्करोग तज्ज्ञांना जाणवत असे.

दररोज पोट साफ होण्यास आयुर्वेदाने महत्त्व दिले आहे. ते निरोगी माणसाचे एक लक्षण मानले आहे. कर्करोगाच्या रुग्णांना यात अधिक महत्त्व दिले जाते. त्यासाठी रसायू कॅन्सर क्लिनिकने हा संशोधन प्रकल्प केला.

संशोधनाच्या निष्कर्षाबद्दल बोलताना रसायू कॅन्सर क्लिनिकचे वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, आयुर्वेदिक औषध घेतलेल्या रुग्णांच्या बद्धकोष्ठतेच्या समस्येत लक्षणीय फरक पडला होता. बद्धकोष्ठतेवर प्रभावी उपचारातून कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णाचे जीवन सुसह्य झाले पाहिजे, यावर या संशोधनाने भर दिला. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल जगभरातील कर्करोग तज्ज्ञांनी याचे कौतुक केले. पण हा शोधनिबंध या परिषदेतील आकर्षणाचा प्रमुख केंद्र ठरला. स्पेनच्या परिषदेत सर्वाधिक भेट दिलेल्यांमध्ये याचा समावेश झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर रसायू कॅन्सर क्लिनिकला मान्यता मिळाली.

या संशोधन प्रकल्पात वैद्य योगेश बेंडाळे, वैद्य विनिता बेंडाळे, वैद्य अविनाश कदम, वैद्य आनंदराव पाटील, वैद्य पूनम  बिरारी-गवांदे, वैद्य वैशाली धाराशिवे-पाटील यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.