Pune : कात्रजच्या पेशवे तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी या ग्रामपंचातीच्या अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठीच्या 9 कोटी 26 लाख रुपये खर्चाच्या निविदेला गुरुवारी स्थायी समितीने मान्यता दिली. यामुळे कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयामध्ये वरील भागातून येणारे मैलापाणी रोखण्यास मदत होणार आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.

हा परिसर पूर्वी महापालिका हद्दीत नसल्यामुळे येथे ड्रेनेजची सक्षम व्यवस्था नव्हती. त्यामुळे या भागातील सांडपाणी ओढ्यातून नानासाहेब पेशवे तलावामध्ये येत होेते. यामुळे तलावातील पाणी दुषित झाले असून जीवसृष्टी धोक्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी भिलारेवाडी व मांगडेवाडी भागात निर्माण होणारे सांडपाणी तलावाच्या बाहेरील बाजूने ड्रेनेज लाईन टाकून वाहून नेण्यासाठी सत्ताधारी भाजपने 10 कोटी रुपयांचे वर्गीकरण केले होते. परंतु हद्दीबाहेर हे पैसे वापरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तसेच पक्षीय राजकारण झाल्याने काम होऊ शकले नाही.

या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेउन यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी तरतूद केली होती. त्याच्या निविदाही मागविण्यात आल्या आहेत. या कामासाठी तीन निविदा आल्या असून मे. विनोद मुथा या कंपनीची निविदा सर्वात कमी दराची आली आहे. निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.