Pune : डीएसके यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्याचे आदेश

एमपीसी न्यूज- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्यात यावी, असा आदेश विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी सोमवारी (दि. 20) दिला. ठेवीदारांची फसवणूक प्रकरणामध्ये कुलकर्णी यांच्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांना पैसे परत करण्यात यावेत, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याबाबत जाहीर नोटीस काढण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

नोटीस काढल्यानंतर मालमत्तेबाबत एखाद्याची हरकत असेल तर त्यांनी 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहून हरकती मांडाव्यात तसेच सूचना कराव्यात. त्या हरकतींचा निपटारा केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या 463 स्थावर जंगम मालमत्ता ईडी आणि शासनाने जप्त केल्या आहेत. कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा लिलाव केल्यानंतर त्यातून मिळणारे पैसे प्रथम कुलकर्णी यांनी बँकांमधून काढलेल्या कर्जाची रक्कम परत करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित रक्कम ठेवीदारांना परत करण्यात येणार आहे. कुलकर्णी यांच्या मालकीच्या आलिशान मोटारी तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कुलकर्णी यांच्या मालकीची 46 वाहने असून 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 13 वाहनांचा लिलाव 15 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.

राज्यात वेगवेगळ्या भागात कुलकर्णी यांच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांची विक्री केल्यानंतर दीड हजार कोटी रुपये मिळतील, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी दिली. दरम्यान, कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे आणि लेखापाल धनंजय पाचपोर यांच्या जामिनावर 24 जानेवारी रोजी युक्तिवाद होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.