Pune : दुकाने बंद असल्याने पेठांमधील व्यापाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट – विशाल धनवडे

Due to the closure of shops, the condition of traders in Peth is very bad - Vishal Dhanavde

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुणे शहरातील रविवार पेठ, नाना पेठ, बुधवार पेठ आणि रास्ता पेठ परिसरातील व्यापाऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मागील जवळपास तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे इतर भागांप्रमाणे या व्यापाऱ्यांनाही व्यवसाय करण्यासाठी सूट  देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे.

या पेठांमध्ये कपडे, हार्डवेअर, सोने – चांदीचे, बोहरी आळी, स्टाईल, गाड्यांचे स्पेअर पार्ट, अशी ही व्यापारी दुकाने आहेत.

दुकाने सुरू करण्यासाठी या भागांतील व्यावसायिक वारंवार महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. आयुक्तांनी या भागाचा आढावाही घेतला आहे.

पोलीस मात्र कोरोनाच्या भीतीमुळे दुकाने उघडू देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. पेठांमधील 90 टक्के कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.

त्यामुळे केवळ 10 टक्के रुग्णांसाठी व्यावसायिकांना त्रास का दिला जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

दुकाने बंद असल्याने उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे दुकानाचे भाडे कसे भरावे, कर्मचाऱ्यांना पगार कोठून द्यावा, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत व्यवसाय बंद असल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

त्यामुळे त्यांना दिलासा देऊन तातडीने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, असेही विशाल धनवडे यांनी सांगितले. कोरोनामुळे आता लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे.

लोक स्वतःहून मास्क, सॅनिटायजरचा वापर करू लागले आहेत. सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन करून या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.