BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)

INA_BLW_TITLE
 एमपीसी न्यूज- कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा दांडेकर पूल येथील जनता वसाहत परिसरात गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री जलवाहिनी फुटून हाहाकार उडाला. परिसरातील सात ते आठ घरात पाणी शिरल्यामुळे मोठे  नुकसान झाले. अचानक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना आपला जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. 
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पद्मावती परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटून घरात पाणी शिरल्याने परिसरातील सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले. घरातील चीजवस्तू, जीवनावश्यक वस्तू पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. काही घराच्या पक्क्या भिंतीही ढासळल्या तर काही घरातील मौल्यवान वस्तू, टीव्ही, फ्रीज, कपडे इतस्ततः पसरले गेले.
  • काही महिन्यांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणारा कालवा फुटल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. त्यावेळी येथील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. या धक्क्यातून सावरले जात असतानाच गुरुवारी रात्री पुन्हा पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे मोठे हाल झाले.

लग्नासाठी तयार केलेले साहित्य गेले पाण्यात वाहून

संगीता भरत काशिद यांच्या मुलीच्या लग्नासाठी पै पै जमवून खरेदी केलेले साहित्य पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे काशीद कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. संगीता काशिद म्हणाल्या की, जनता वसाहत मध्ये मागील 25 वर्षापासुन राहत आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आमच्या घराच्या खालून गेलेली जलवाहिनी काही समजण्याच्या आत अचानक फुटली. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण शक्य झाले नाही. बाहेरुन लोकानी दरवाजा तोडल्याने आमची सुटका झाली. अन्यथा माझ्यासह पती, दोन मुली, एक मुलगा आणि भावाच काही खरे नव्हते. आमचा जीव वाचला, पण दोन महिन्यानंतर मुलीचे लग्न आहे. लग्नासाठी कष्ट करून जमवलेले सर्व साहित्य, दागिने पाण्याबरोबर वाहून गेले. माझे पती हमाली करतात आणि मी भाजीविक्री करून एक एक पैसा जमवून खरेदी केली. हे सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.

HB_POST_END_FTR-A4

.