Pune : लॉकडाउन आणि निर्यात बंदीमुळे आंबा उत्पादक, व्यापारी हवालदिल

एमपीसी न्यूज : सीझन ऐन भरात येत असतानाच लॉकडाउन आणि निर्यात बंदी यामुळे आंबा उत्पादक आणि त्यांना आगाऊ पैसे दिलेले व्यापारी हवालदिल झाले आहेत. यंदाचा सीझन हातचाच गेला, अशी भावना रत्नागिरीतील आंबा उपादकांची झाली आहे.

साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीत आंब्याच्या झाडांची फळे उतरवून, त्यांची प्रतवारी करुन त्यांच्या आढ्या घातल्या जातात. बाहेरच्या बाजारपेठांमध्ये हा माल पाठविण्याच्या दृष्टीने तयारी होत असते. मार्चचा दुसरा आठवडा ते एप्रिलचा पहिला आठवडा या काळात फळं पिकण्याची प्रक्रिया होत असते.

याच काळात ती फळे टिकतात, आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना किंमत येते. परिपक्व झालेला आंबा आईस्क्रीमचे कारखानदारही याचदरम्यान उचलतात. परदेशात होणारी निर्यात आणि आईस्क्रीम कारखानदार हेच आंबा उत्पादकांचे मोठे गिऱ्हाईकं असतात. कोरोनामुळे जगभरातच व्यवहार ठप्प असल्याने विमान, जहाज वाहतूक बंद आहे. येत्या दोन-तीन आठवड्यातही ती सुरळीत होईल कि नाही याची शंकाच आहे. त्यामुळे आंबा उत्पादक, व्यापारी चिंतेत आहेत.

कोकणातल्या आंबा उत्पादकांचा भर हा सध्या देशांतर्गत माल विकण्यावर रहाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये घरपोच माल देता येईल का? याविषयी त्यांची चाचपणी चालू आहे. काही उत्पादक आंब्याचा रस आटवून ठेवण्यावर भर देणार असल्याचे रत्नागिरीतील आंबा उत्पादकांनी सांगितले. शहरांमधील आर्थिक स्थिती तंगीची आहे. लॉकडाउनचा कालावधी अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांची काळजी अजूनच वाढली आहे.

पुण्या, मुंबईत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा विक्रीला सुरुवात होते. लॉकडाउनचा कालावधी वाढला तर या नाशवंत फळांचे काय होणार? याची धास्तीही आंबा उत्पादकांना वाटते आहे.

दिल्लीतील काही व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील आंबा उत्पादकांना आगाऊ पैसे दिलेले असतात. अशा पद्धतीने मोठ्या रकमा देऊन व्यवहार केलेले व्यापारी अडचणीत आलेले आहेत. चांगल्या प्रतीचा आंबा विक्रीसाठी आपल्याला मिळेल का नाही, याची त्यांना शंका वाटतेय.

आंब्याचे दर पन्नास टक्क्यांपेक्षा खाली

रत्नागिरीतील आंबा उत्पादकांमधील जाणकारांशी चर्चा केली असता असे समजले की कमी थंडी, लांबलेला पाऊस यामुळे १५एप्रिलपर्यंत सीझनही लांबलेला आहे. आजमितीला दहा टक्केच फळे विक्री योग्य झालेली आहेत.

कोकणातील आंबा आखाती देशांमध्ये पाठविला जातो. त्या देशांवरही साथीचे सावट आहे. त्यामुळे तेथील मागणीचा अंदाज नाही. समुद्र मार्गे आंबा पाठविता येईल का? यावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा चालू आहे.

सध्या आंब्याला मागणी नाही आणि आंब्याचे दर पन्नास टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत. १५ एप्रिल नंतर याबाबतचे चित्र आधिक स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.