Pune : दुर्गोत्सवामध्ये “अमृतवर्षीणी”ला रसिकांची उत्स्फूर्त दाद

एमपीसी न्यूज – शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री ही नवदुर्गेची विविध रूपांची अनुभूती भरतनाट्यमद्वारे पुणेकरांनी घेता आली. बंगाली असोशिएशनतर्फे आयोजित दुर्गापुजेमधील ‘अमृतवर्षीणी’ या कार्यक्रमाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. मृदंगम, तालम, वीणा, बासरी, घटम आदि वाद्यांच्या साथसंगतीने परिसर दुमदुमून गेला.

पौराणिक देवीरुपी स्त्री ते नावीन्य देवीरुपी स्त्री यांच्यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न ‘अमृतवर्षीणी’ या कार्यक्रमात केला गेला. कार्यक्रमाची सुरुवात गणेशपर्णाने केली गेली, विविध सुगंधित फुलांची पुष्पांजलीची ओंजळ नवदुर्गेला अर्पण करत दुसरी रचना सादर करण्यात आली. चंडमुंड राक्षसांचा संहार करण्यासाठी महिषासुर मर्दिनीने जेंव्हा आपलं रौद्ररूप धारण केलं याची रचना ही आजही लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. ही रचनादेखील भरतनाट्यमद्वारे सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आईगिरी नंदिनी या प्रचलित रचनेने झाली.

बंगाली असोशिएशनतर्फे दरवर्षी बाणेर भागात दुर्गापुजेबरोबर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये सई परांजपे प्रस्तूत ‘अमृतवर्षीणी कार्यक्रमाबरोबरच शास्त्रीय कलांशी निगडीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध आभुषणे, कपडे, दागिने याबरोबरच शास्त्रीय कलेशी निगडीत इतर वस्तू देखील होत्या. दुर्गोत्सवामध्ये लेफ्टनंट जनरल तापस कुमार बंडोपाध्याय हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.