Pune E-Bike News : ई-बाईक योजनेसाठी 500 पार्किंग जागा मोफत; स्थायी समितीची मान्यता, पण महाविकास आघाडीचा विरोध

एमपीसी न्यूज : कोट्यवधींचा चुराडा करणाऱ्या सायकल योजनेला बासनात गुंडाळल्यानंतर आता महापालिकेने ‘ई-बाईक’ योजनेचा घाट घातला आहे. 5000 ई बाईकच्या पार्किंगसाठी 500 ठिकाणच्या मोक्यावरच्या जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला. धक्कादायक बाब म्हणजे सभासदांच्या या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

काही वर्षांपूर्वी पर्यावरण पूरक प्रदुषणमूक्त वाहतुकीसाठी सायकल योजना सुरू केली होती. शहरामध्ये विविध ठिकाणी 500 सायकलींना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली होती. परंतु, ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली.

पुण्याच्या विविध भागांमध्ये लावलेल्या सायकली अक्षरश: चोरीला गेल्या. तर,काही भंगारात विकल्या गेल्या. काही सायकली निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामधून पालिकेला कोट्यावधींचा आर्थिक तोटा झाला नसला तरी फायदा देखील झाला नाही.

या योजने संदर्भात माहिती देताना स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ई-बाइक संदर्भात सकारात्मक अभिप्राय स्थायी समितीला देण्यात आला आहे. प्रदुषणमुक्त पुण्यासाठी याला मान्यता देण्यात आली आहे. 500 ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी देण्यात येणार आहेत.

4 रुपये प्रतिकिलोमीटर दराने ही बाईक नागरीकांना उपलब्ध होऊ शकेल. एकूण उत्पन्नातून 2 टक्के महापालिकेला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधी पक्षनेत्या नगरसेविका दिपाली प्रदिप धुमाळ म्हणाल्या, ई बाईकच्या नावाखाली खासगी कंपन्यांचे हित साधण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने स्थगित करून इलेक्ट्रीक बसची संख्या वाढवावी अशी आमची मागणी आहे.

काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले,महापालिकेत मुख्य सभा सर्वोच्च आहे. पक्षनेत्यांशी कुठलिही चर्चा न करता धोरणात्मक निर्णय कसा काय घेतला. पीएमपीएमएल तोट्यात असताना ई बाईकमुळे पुन्हा तोट्यात ढकलणारी ही योजना आहे.

पार्कींगच्या जागा देण्यापुर्वी मुख्य सभेची अंतिम मान्यतेशिवाय निर्णय कसा काय घेतला. सायकल शेयरिंग योजना जशी फसली, सायकली चोरीला गेल्या भंगारात विकल्या त्याप्रकारची ही पण योजना आहे. सत्ताधारी भाजपाकडून घाईगडबडीत लपवाछपवी करत ही योजना रेटली जात असेल तर काँग्रेस पक्षाचा या योजनेला विरोध आहे.

शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले, पुणेकरांच्या विकासाआड शिवसेना नाही पण विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्यांचा आर्थिक फायदा आम्ही होऊ देणार नाही. संख्याबळाच्या जोरावर सर्वपक्षीय पक्षनेत्यांशी कुठलिही चर्चा न करता ई बाईक योजना मंजूर केली आहे. मेट्रो येणार आहे, पीएमपीएमएल बसच्या ताफ्यात बसची संख्या वाढवायची तर ई बाईक बेकायदेशीर योजना रेटली जातेय त्याला आमचा विरोध आहे.

अशी असेल ई बाईक योजना…

– विट्रो मोटर्स प्रा.लि.कंपनी देणार सुविधा
– सुमारे 5000 ई बाईक धावणार
– महत्वाचे रस्ते, चौक, आयटी पार्क, बाजार पेठा, मॉल्स, सिनेमागृहे आदी वर्दळीच्या 500 ठिकाणी पार्किंग
– बाईक पार्किंग एरियासह विविध ठिकाणी चार्जिंग पॉइंट उभारणार
– 4 रुपये प्रतिकिलोमीटर दर
– हेल्मेट व लायसन बंधनकारक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.