Pune : इ सातबारा उतारे फक्त माहितीसाठी, मात्र कायदेशीर कामांसाठी ग्राह्य नाहीत

एमपीसी न्यूज- शहरात असलेल्या महा इ सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणाहून शासनाच्या संकेतस्थळावरून इ सातबारा उतारे डाउनलोड करून घेतले जातात. असे सातबारा उतारे संबंधित केंद्र चालकाचा सही शिक्का वापरून वितरित केले जातात. मात्र असे सातबारा उतारे फक्त माहितीसाठी असून त्याचा उपयोग कोणत्याही कायदेशीर कामासाठी करता येणार नाही असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या सातबारा उताऱ्याचा आधारे काही बँक, सोसायट्या यांनी कर्जे वितरित केलेली आहेत. जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार देखील झालेले असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पद्धत बेकायदेशीर असून त्यामुळे बँकांची किंवा खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने भूलेख किंवा महाभूमी संकेतस्थळावरून सातबारा उतारा घेतलेला असेल तसेच त्यावर फक्त माहितीसाठी असा वॉटर मार्क असेल तर असे सातबारा उतारे कोणत्याही शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.