Pune – मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ई-मूल्यांकन प्रणालीद्वारे मूल्यांकनाची सुविधा 1 जानेवारी 2020 पासून उपलब्ध

एमपीसी न्यूज – दस्त नोंदणीकामी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक मूल्यदर तक्ते व सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना नोंदणी विभागामार्फत प्रतिवर्षी निर्गमित केल्या जातात. मूल्यांकनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना या तांत्रिक स्वरुपाच्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यासाठी दुय्यम निबंधक अथवा अन्य नोंदणी कार्यालयाकडे संपर्क साधून मूल्यांकन व त्यावर मुद्रांक शुल्क आकारणीची रक्कम निश्चित करुन घ्यावी लागत होती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी प्रथमत: सन 2018-19 मध्ये ई-मूल्यांकन प्रणाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. आता उर्वरित महाराष्ट्रासाठी ई-मूल्यांकन प्रणालीची सुविधा नागरिकांना 1 जानेवारीपासून उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी दिली.

ई-मूल्यांकन या मूल्यांकन प्रणालीद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नोंदणी कार्यालयात न जाता घरबसल्या मिळकतीचे बाजारमूल्य जाणून घेता येणार आहे. ई-मूल्यांकन संगणक प्रणालीमध्ये मिळकतीची माहिती भरल्यानंतर, त्या माहितीआधारे अचूक मूल्य ठरविले जाऊन, त्यामध्ये एकसमानता येणार असून मूल्यांकनाचे प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे.

सदर ई-मूल्यांकन प्रणाली नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे व सहसंचालक, नगर रचना, मूल्यांकन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आली असून, नववर्षामध्ये नागरिकांना पारदर्शकपणे तत्पर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा नोंदणी विभागाचा प्रयत्न आहे. सदर प्रणाली नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर “ऑनलाईन सर्व्हिसेस” या शीर्षाखाली “ई-मूल्यांकन” या ठिकाणी उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.