Pune : ‘ईस्ट -वेस्ट फ्युजन’ ने जिंकली रसिकांची मने !

एमपीसी न्यूज- भारतीय संस्कृतीतील कला जोपासण्यासाठी तसेच वृद्धिंगत व्हावी यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडील गायन आणि तालवाद्यांतील सुरांचा एक अनोखा मिलाफाचा कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला होता . ‘उदय ईस्ट -वेस्ट फ्युजन बॅण्ड’ ने हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘ढेपे वाडा’ (गिरीवन ,मुळशी ) येथे हा कार्यक्रम झाला.

झेक रिपब्लिक देशातील जॉन कॅन्कले, (सॅक्सोफोन-बासरी ), विनीत अंतुरकर (गायन ,गिटार ), भूपाल लिमये (मेंडोलीन), नीरज प्रेम ( कॅनडा ), उदय रामदास (गायन ,तबला ) या मिलाफ कार्यक्रमात सहभागी झाले .

जुन्या मराठी वाडा संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या आलिशान दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही फ्युजन मैफिल रंगली . हंसध्वनी ,चारुकेशी, खमाज या भारतीय रागदारीवर आधारित रचना सादर झाल्या. जॅझ, वेस्टर्न क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या . आफ्रिकन, मराठी लोकसंगीतही रसिकांना मोहवून गेले. भैरवी रागाने मैफलीची सांगता झाली. या सर्व सादरीकरणाला रसिकमंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन ऋचा ढेपे यांनी केले.

जॉन कॅन्कले म्हणाले,”भारतीय संस्कृती आणि संगीत महान असून ढेपे वाड्यामुळे जुन्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा प्रत्यय येतो. वेगळ्या वातावरणात या मैफलीचा आनंद वेगळाच होता”

नितीन ढेपे म्हणाले,”संगीत आणि कलेला भाषा ,देशाच्या सीमा नसतात ,हेच या मैफलीमुळे सिद्ध झाले . अशा आगळ्या वेगळ्या संकल्पना ढेपे वाड्यात सादर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे” ‘ढेपे वाडा ‘चे संचालक नितीन ढेपे, ऋचा ढेपे यांनी कलाकारांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.