Editorial : या कोरोनाचं करायचं काय?

जगात यावर्षी आतापर्यंत एकूण एक कोटी 63 लाख 43 हजार मृत्यू, जगातील एकूण मृत्यूंमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण केवळ 0.63 टक्के

विवेक इनामदार, एमपीसी न्यूज – जगात यावर्षी कितीजणांचा मृत्यू झाला, त्यापैकी कोरोनाबाधित मृतांची संख्या किती, मृतांमध्ये केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण काय, असे किती तरी प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या मनाला भेडसावत आहेत. कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडल्याची बातमी काल रात्री आली, तेव्हा बहुतांश लोकांच्या छातीत भीतीने धडकी भरली. या पार्श्वभूमीवर वरील प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘एमपीसी न्यूज’ने केला. त्यात मिळालेली माहिती कोणतेही मतप्रदर्शन न करता आम्ही वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.

एक जानेवारी 2020 पासून आतापर्यंत जगात एकूण 1 कोटी 63 लाख 43 हजार 400 जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. कोविड-19 या विषाणूची लागण झालेले एकूण 1 लाख 2 हजार 734 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण हे एकूण मृत्यूंच्या तुलनेत केवळ 0.63 टक्के असल्याचे दिसून येते.

जगाची एकूण संख्या 777 कोटी 69 लाख 78 हजारच्या पुढे गेली आहे. त्यात दर सेकंदाला भर पडत आहे. एक जानेवारी 2020 पासून जगात सुमारे 3 कोटी 89 लाख 29 हजार बालकांचा जन्म झाला असून याच काळात विविध कारणांनी जगात सुमारे 1 कोटी 63 लाख 43 हजार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे यावर्षी लोकसंख्येत सुमारे 2 कोटी 25 लाख 86 हजारने वाढच झाल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी आम्ही मनाने दिलेली नाही तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या विभागाकडून इंटरनेटवर उपलब्ध असलेली ही माहिती आहे.

वर्षभरात जगात सुमारे सहा कोटी मृत्यू

प्रत्यक्ष जनगणना दहा वर्षांनी करण्याची पद्धत असली तरी उपलब्ध आकडेवारीचा संख्याशास्त्रीय अभ्यास करून जन्मदर आणि मृत्यूदर निश्चित करून त्याआधारे लोकसंख्या वाढीचा दर निश्चित करण्यात येतो. या आकडेवारीच्या आधारे सध्याची व भविष्यातील लोकसंख्येचे संभाव्य आकडे मांडले जातात. त्यानुसार जगातील सध्याचा जन्मदर हा 1.8 टक्के तर मृत्यूदर 0.76 टक्के आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर 1.04 एवढा आहे.  सध्याची जगाची लोकसंख्या 777 कोटींच्या घरात आहेत. मृत्यूदराचा विचार करता एका वर्षात जगभरात सुमारे सहा कोटी लोकांचा मृत्यू होईल, असा संख्याशास्त्रीय अंदाज आहे.

कोविड -19 विषाणूचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहारात एक डिसेंबर 2019 ला आढळल्याची नोंद आहे. त्याचा झपाट्याने संसर्ग होऊन कोरोनाचा पहिला बळी जानेवारी 2020 मध्ये गेल्याचे दिसून येते. तेव्हापासूनची कोरोना बळींची आकडेवारी, त्यात होत गेलेल्या लक्षणीय वाढीचे प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे, मात्र जगात विविध कारणांनी होणाऱ्या एकूण मृत्यूंची संख्या लक्षात घेतली तर कोरोनाच्या बळींची संख्या फारशी काळजीत पाडणारी वाटत नाही. या आजारावर अजूनही खात्रीशीर औषध व प्रतिबंधक लस उपलब्ध नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे.

कोरोनाला ‘एकटं’ पाडूयात

कोरोनाचे बळी म्हणून समोर येणाऱ्या माहितीचे विश्लेषण केले तर संबंधित रुग्णांना आधीपासून अन्य आजार, व्याधी असल्याचे दिसून येते. अनेक रुग्णांची प्रकृती आधीच चिंताजनक होती. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. अनेकांचे मृत्यूनंतर कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आले आहेत. कोणाचे वय झाले होते, कोणाला मधुमेहाचा त्रास होता, कोणाला हृदविकाराचा त्रास होता, कोणाला मूत्रपिंडाचे विकार होता. अशी अनेक कारणे पुढे येत आहेत. थोडक्यात काय तर केवळ कोरोना झाला आणि मृत्यू झाला, असे एकही उदाहरण निदान आमच्या तरी माहितीत नाही. त्याबाबतचे नेमके विश्लेषण डॉक्टर मंडळीच करू शकतील. कोविड 19 हा विषाणू जीवघेणा नाही, मात्र तो मृत्यूस कारणीभूत ठरतोय, ही वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही.

आतापर्यंत पावणेचार लाख रुग्ण कोरोनामुक्त 

कोविड -19 ची बाधा म्हणजे मृत्यू हा गैरसमज आता बऱ्यापैकी दूर होऊ लागला आहे. जगात आतापर्यंत कोरोनाचे 3 लाख 76 हजार 521 रुग्ण उपचारांनी बरे झाले आहेत. भारतात 744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अगदी पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या टप्प्यातील 12 ही रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याचे आपण पाहिले आहे. याचाच अर्थ कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. शंभरातील सुमारे 80 रुग्णांना तर कोणतीही लक्षण दिसत नाहीत. 15 रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसतात पण ती सौम्य प्रकारची असतात व औषधांनी बरे होतात. पाच टक्के रुग्णांना मात्र रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, असे डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

एक लाखांत 20 जणांना कोरोनाची लागण

जगातील एकूण लोकसंख्येचा विचार करता कोरोना केवळ 0.02 टक्के लोकांपर्यंत पोहचला आहे. म्हणजेच एक लाख लोकांमागे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20 तर कोरोनाच्या बळीची संख्या एक लाख लोकसंख्येमागे 1.29 एवढे आहे. ही सर्व माहिती घेतल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र कोरोनाला अगदी किरकोळीत घेण्याचेही कारण नाही. कोरोनाकडे प्रारंभी गांभीर्याने पाहिले नाही, त्या अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या प्रगत देशांमध्येच कोरोनाचा धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रसार त्या देशातील तज्ज्ञांच्या कल्पनेपलिकडे झाल्याने परिस्थिती नियंत्रणापलिकडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्या तुलनेत भारताने वेळीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लॉकडाऊनसारखी कडक उपाययोजना केली. त्यामुळे तुलनेत भारतात कोरोनाचा प्रसार नियंत्रित ठेवता आले आहे.

खात्रीशीर औषधाचा शोध लावण्याचे आव्हान

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी देशहितासाठी, व्यापक समाजहितासाठी आपल्याला अजूनही काही दिवस हा त्रास सहन करावा लागेल.  केंद्र शासन व राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करूयात. सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळूयात. कोरोनावर अजूनही खात्रीशीर औषध आणि प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहेत. कोरोनावरील खात्रीशीर औषध व प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. त्यांना त्यात लवकरच यशही मिळेल. तेव्हा जागतिक आकडेवारी, कोरोनाबाधितांचे व मृतांचे लाखातील आकडे पाहून घाबरून जाऊ नका. मानव जात नष्ट होणार, वगैरे सारख्या अफवांनी निराश होऊ नका. मानवाने आतापर्यंत अनेक विषाणू पचविले आहेत, तसेच कोरोनालाही संपविल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही. दक्ष राहूयात आणि कोरोनाला कायमचा संपवून टाकूयात!

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.