Pune : आठवी सातारा हिल हाफ मॅरेथॉन २५ ऑगस्ट रोजी; आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपट्टूंसह साडेआठ हजारजण धावणार

पुण्यातून ८४२ जणांचा सहभाग; सातारा रनर्स फौंडेशनच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – सातारा रनर्स फौंडेशन आयोजित सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) होत असून आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटूंसह आठ हजार ५०० हून अधिक धावपटू साताऱ्यातील रस्त्यांवरुन धावणार आहेत. पुण्यातील जवळपास ८४२ धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्यातील पोलिस कवायत मैदानावरुन सुरू होऊन पोवईनाका, कर्मवीर पथावरुन राजवाडामार्गे बोगदा व तेथून यवतेश्‍वर घाटाकडे मार्गस्थ तर परत येताना बोगदा, अदालतवाडा, नगरपालिका, रविवार पेठ पोलिस चौकीमार्गे कर्मवीर पथावरुन पोवई नाका व पुन्हा पोलिस कवायत मैदान असा मॅरेथॉनचा ढोबळ मार्ग असेल, अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव गोळे आणि सचिव जितेंद्र भोसले यांनी दिली.

मॅरेथॉनविषयी बोलताना संस्थापक डॉ. संदीप काटे, डॉ. शेखर घोरपडे यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय दर्जाची ही मॅरेथॉन साताऱ्याचा मानबिंदू ठरली आहे. स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, वाहतूक नियंत्रण कक्ष, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांनी आवश्‍यक सर्व प्रशासकीय नियोजन केले आहे.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ढाणेज् मेघा इंजिनीअरिंग क्लासेस, किराणा भुसार रिटेल व्यापारी संघटना, १०० केपी ग्रुप, महाराजा ग्रुप, सावकार इंजिनिअरिंग कॉलेज, विद्यार्थी वाहतूक सेवा संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वर्कफोर्स सोल्युशन सातारा, एस.के. करिअर ॲकॅडमी, शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले टेक्निकल इन्स्टिटयूट, कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ फिजिओथेरपी, कै.संजय भोसले स्मृती प्रतिष्ठान, जेष्ठ नागरिक संघ, प्रतिभा हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल स्टाफ, कन्याशाळेच्या विद्यार्थिनी, आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटना, महात्मा गांधी क्रीडा मंडळ, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी देखील कंबर कसली आहे.

यवतेश्वर आणि सांबरवाडी येथील ग्रामस्थांनी देखील पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. स्पर्धकांसाठी साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फुल्ल झाले असून विविध कार्यालयांमध्येही स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. काहींना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी या पाहुण्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आपल्या घरी करावी, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांनी केले आहे.

असा असेल मॅरेथॉन मार्ग
सातारा हिल हाफ मॅरेथॉनला पोलिस कवायत मैदानावरुन सुरूवात होईल. तेथून पोवई नाकामार्गे कर्मवीर पथावरुन (खालचा रस्ता) पोलिस मुख्यालय, शेटे चौकमार्गे कमानी हौद, तेथून राजपथावरुन मोती चौक, गोल बाग, यादोगोपाळ पेठ, समर्थ मंदिर, बोगदा, यवतेश्वर घाटातून प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्यापुढे २०० मीटर मॅरेथॉन जाईल. परत त्याचमार्गे यवतेश्वर घाटातून समर्थ मंदिर, अदालत वाडा, केसरकर पेठ, शाहू चौक, बगाडे हॉस्पिटल, रविवार पेठ पोलिस वाहतूक शाखेपासूनखाली वळून खालच्या रस्त्याने, पोवई नाका व तेथून पुन्हा पोलिस कवायत मैदान असा मॅरेथॉनचा मार्ग राहिल, अशी माहिती रेस डायरेक्टर डॉ. देवदत्त देव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.