Pune : ‘कोरोना’च्या संकटानंतर रेल्वेची वाहतूक विनाअडथळा होण्यासाठी विद्युत विभागाची कामे सुरू

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या संक्रमणामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यात रेल्वेने देखील प्रवासी वाहतूक थांबून लॉकडाऊन पाळला आहे. या संकटानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत आणि विनाअडथळा होण्यासाठी विद्युत विभागाने ठीकठिकाणची कामे सुरू केली आहेत. रेल्वेच्या विद्युत विभागातील हे योद्धे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याची खबरदारी घेऊन युद्ध पातळीवर कामे करीत आहेत.

मध्य रेल्वेच्या विद्युत विभागाची ट्रॅक्शन डिस्ट्रीब्यूशन (टीआरडी) शाखा मुख्यत्वे रेल्वेला ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वीजपुरवठ्याची जबाबदारी सांभाळते, तसेच ट्रेन्सच्या सुरळीत संचालनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अन्नधान्य, औषधे, भाजीपाला माल आणि पार्सल गाड्यांद्वारे आवश्यक वस्तूंचा अविरत पुरवठा निश्चित करण्यासाठी, ओव्हर हेड इक्विपमेंट्स (ओएचई) आणि वीजपुरवठा प्रतिष्ठापन (पीएसआय) च्या देखभालीसाठी टीआरडी शाखा कार्यरत असते.

टीआरडी शाखेने मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या पाचही विभागांवर पॉवर ब्लॉकद्वारे गाड्यांच्या सुलभ संचालनासाठी क्रॉसओव्हर, टर्नआउट्स, मास्ट्स, कॅन्टीलीव्हर इत्यादींची देखभाल करण्याची कामे सुरू केली आहे. रेल्वे सुलभतेने चालवण्याच्या दृष्टीने ओव्हर हेड इक्विपमेंट्सची (ओएचई) टॉवर वॅगन व पायी पेट्रोलिंगद्वारे विभागांतील लाइव्ह लाईन चेकिंग केली जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचार्‍यांना फेस मास्क, सॅनिटायझर्स, साबण, हातमोजे, जंतुनाशक इत्यादींचा पुरवठा आणि कामकाजाच्या दरम्यान सामाजिक अंतर देखील पाळले जात आहे.

या कठीण काळात टीआरडी अधिका-यांनी केलेली देखभाल कौतुकास्पद आहे. कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व कार्यशक्तींना समर्पित केले आहे. आवश्यक वस्तूंचा अखंडित पुरवठा करण्यासाठी माल आणि पार्सल गाड्यांची अडचण न होण्यासाठी तसेच देशभरात लॉकडाऊन दरम्यान अन्नपुरवठा करुन अडचणीत असलेल्या लोकांची रेल्वेकडून काळजी घेतली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.