Pune : प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व क्वारंटाईनवर भर द्यावा – डॉ.सुधीर गुप्ता

Emphasis on a survey, contact tracing and quarantine in Containment Zones - Dr. Sudhir Gupta

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे तसेच आवश्यकते नुसार क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, अशा सूचना क्रेंदीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त उपमहासंचालक डॉ.सुधीर गुप्ता यांनी केल्या.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकाच्या सदस्यांनी कोविड 19 ची वाढती रुग्ण संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावेळी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक उप महासंचालक डॉ. मानस रॉय, वरिष्ठ क्षेत्रीय संचालक डॉ.अरविंद अलोणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. आर. एस. आडकेकर उपस्थित होते.

डॉ. गुप्ता म्हणाले, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पुणे जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा व माहिती घेणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांची रुग्णालये तसेच ससून, भारती हॉस्पिटल आदी कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना भेटी देवून पाहणी करणार आहे.

डॉ. म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.