Pune : हास्य-विनोदाच्या वातावरणात ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा समारोप

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’द्वारे आयोजित 10व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चा मंगळवारी हास्य कल्लोळाच्या वातावरणात समारोप झाला.

‘नासा’ने संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या नावाने नव्याने शोध लागलेल्या एका ग्रहाचे नामकरण केले. तसेच पं. जसराज यांचे नव्वदी पूर्ती वर्ष असल्याने यंदाचा ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सव’ त्यांना समर्पित करण्यात आला होता. महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे यंदाही अनेक मान्यवर दिग्गजांनी महोत्सवाला हजेरी लावत आपली कला सादर केली. महोत्सवा’च्या चौथ्या व अखेरच्या दिवसाची सायंकाळ दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’च्या लाईव्ह एपिसोडच्या हास्य-विनोदाच्या कल्लोळाने दुमदुमली.

समारोपाच्या दिवसाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी भाजपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते गणेश बिडकर, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष व संवाद पुणेचे संस्थापक सुनील महाजन, नगरसेविका वासंती जाधव, मंजुषा खर्डेकर, हर्षली माथवड, बढेकर ग्रुप्सचे प्रवीण बढेकर, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे विशाल गोखले, रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर, प्रवीण मसालेचे अध्यक्ष विशाल चोरडिया, पी.एन.जी.चे सौरभ गाडगीळ, शिव जावडेकर आदि उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “सलग 10 वर्ष अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणावरील महोत्सव राबविणे ही सोपी गोष्ट नाही. दिल्लीत निवडणुकीची धामधूम असतानाही कोथरूडकरांच्या प्रेमाने मला येथे खेचून आणले आहे.”

यावेळी मोहोळ म्हणाले, “महाराष्ट्राची संस्कुतिक राजधानी पुणे व पुण्याची सांस्कृतिक राजधानी कोथरूड आहे. अशा जाणकार प्रेक्षकांसमोर गेले ९ वर्ष सातत्याने हा महोत्सव साजरा होत असून यंदाचे 10 वे वर्षही याच रसिकांमुळे यशस्वी होऊ शकले आहे. या महोत्सवाच्या मंचावरून कायमच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली कला सादर करू गेले आहे. यंदाही आम्ही ही परंपरा कायम ठेवली. हा दर्जा टिकून राहण्यासाठी अनेकांचा हातभार लागला आणि कोथरूडकर रसिकांनीही त्याला साथ दिली म्हणून मी सगळ्यांचाच आभारी आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.