Pune : ‘कोरोना’शी लढण्यासाठी जिल्ह्यात जलद प्रतिसाद दलांची स्थापना – जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात जलद प्रतिसाद दलांची (क्विक/ रॅपिड रिस्पॉन्स टीम) स्थापना करण्यात येत आहे. तसेच विविध विभागातील वरिष्ठ अधिका-यांचा समावेश असलेली अन्य पथके देखील स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी राम यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्‍हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्‍हा शल्य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, “पुणे शहर आणि जिल्‍ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जलद प्रतिसाद दल स्‍थापन करण्‍यात आले आहे. याशिवाय विविध विभागातील वरिष्‍ठ अधिका-यांचा समावेश असलेली पथकेही स्‍थापन करण्‍यात आली आहेत. या सर्व पथकांनी आपापली जबाबदारी योग्य पध्‍दतीने पार पाडावी. परस्‍पर समन्‍वयातून या संकटावर मात करावयाची असून आपण यात यशस्‍वी होऊ, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्‍हा परिषद, कटक मंडळे यांच्‍या बरोबर समन्‍वय ठेवणे, टूर्स, ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍या, हॉटेल्‍स, विमानतळ प्राधीकरण, लॅबरोटरी (प्रयोगशाळा), सेवाभावी संस्‍था, शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये, शहर वाहतूक यांच्‍याशी संपर्क ठेवून माहिती अद्ययावत करणे, घरातच क्‍वारंन्टाइन (अलगीकरण) असलेल्‍या व्‍यक्‍तींशी संपर्क ठेवून त्‍याबाबतची माहिती अद्ययावत ठेवणे अशा विविध जबाबदा-यांची जिल्‍हाधिकारी राम यांनी माहिती दिली.

आरोग्‍य विभाग तसेच इतर सर्व विभाग समर्पित भावनेने काम करत असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. शासनाकडून कोरोनावर मात करण्‍यासाठी आवश्‍यक ती साधनसामुग्री खरेदी करण्‍यासाठी निधी प्राप्त झाला आहे, त्याचा योग्य पध्‍दतीने विनीयोग व्‍हावा, याचीही काळजी घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.