Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची स्थापना

एमपीसी न्यूज – मंत्रौच्चारांच्या मंगल निनादात दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना झाली. देवता रुपात भगवती देवी सिध्दी, भगवती देवी बुध्दी, गणेशपुत्र लक्ष आणि लाभ आणि भगवान श्री नग्नभैरव यांच्या चांदीच्या मूर्तींचे विधीवत पूजन करुन हा कार्यक्रम पार पडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणपती मंदिरामध्ये भगवान गणेशांच्या परिवाराच्या मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, त्यांच्या पत्नी शारदा गोडसे यांच्या हस्ते व विश्वतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी सुनील रासने, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, राजूशेठ सांकला, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, अक्षय गोडसे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

श्री गणेश देवता परिवारातील सर्व मूर्ती चांदीच्या असून भक्तांनी दिलेल्या देणगीतून साकारल्या आहेत. यामध्ये लाभ २.२७२ कि.ग्रॅम, लक्ष २.२७७ कि.ग्रॅम, श्री देवी बुद्धी ४.८५२ कि.ग्रॅम, श्री देवी सिद्धी ४.९७१ कि.ग्रॅम, श्री नग्न भैरव ४.३९२ कि.ग्रॅम असे एकूण १८.७६४ कि.ग्रॅम अशा वजनाच्या या मूर्ती आहेत.

यावेळी अशोक गोडसे म्हणाले, भगवान श्रीगणेशाच्या विश्वनिर्मिती तसेच संचालन कायासार्ठी त्यांच्या दोन शक्ती ते प्रकट करीत असतात. यापैकी ज्ञानशक्ती असणा-या देवीला श्री बुद्धी तर क्रियाशक्ती असणा-या शक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात. गणेशाच्या उजव्या हाताला देवी बुद्धी विराजमान असते तिच्या एका हातात दीप तर दुस-या हातात कमळ असे पूजा साहित्य असते. श्रीगणेशाच्या डाव्या बाजूला देवी सिद्धी विराजमान असते. एका हातात मोरयाची सेवा करण्यासाठी चवरी तर दुस-या हातात कमळ असे तिचे स्वरुप असते. या दोघींच्यासमोर भगवान श्री गणेशांचे पुत्र रुपात श्री लक्ष आणि श्री लाभ विराजमान असतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, या चार देवतांच्या सोबत भगवान श्री नग्नभैरव स्थापित होत असलेला पाचवा विग्रह आहे. ही भगवान गणेशांची कार्यकारी शक्ती आहे. त्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले असल्याने त्यांना नग्न असे म्हणतात. तर भैरव शब्दात भय आणि रव असे दोन शब्द आहेत. पायाच्या आवाजाला रव असे म्हणतात. ज्यांच्या पायाच्या आवाजाने अर्थात आगमनाची चाहूल लागल्याबरोबर ईश्वर,महेश्वर देखील आदरयुक्त भितीने आपापली कामे निमूटपणे करतात ज्यांना श्रीनग्नभैरव असे म्हणतात. भगवान श्री गणेश यांच्या दर्शनापूर्वी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भगवान श्री नग्नभैरवांची अनुमती घ्यावी, असे शास्त्र सांगते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.