Pune : पत्र पाठवूनही पालकमंत्र्यांची लोकप्रतिनिधींसोबत बैठक नाही : गिरीश बापट

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून आता 2 महिने झाले. पण, अद्यापही त्यांनी लोकप्रतिनिधींसोबत एकही बैठक घेतली नाही. लोकप्रतिनिधी केवळ फिरतायेत. आमचे प्रशासनाला व सरकारला सहकार्य आहे. अनेक ठिकाणी काय प्रॉब्लेम आहेत, ते लोकप्रतिनिधींना माहिती असते. त्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक घेतली पाहिजे. यापुढे जिथे सरकार कमी पडेल, तिथे काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कोरोना विषाणूमुळे पुणे शहरात निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य शासन आणि प्रशासनाला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गिरीश बापट म्हणाले, रेड कंटेनमेंट विभागामध्ये ८० हजार कुटुंबांना शिधा पाकिटे वितरण करण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने एक आठवड्यापूर्वी केली होती. परंतु आठवड्यानंतर जेमतेम २० हजार पाकिटे वाटण्यात आली आहेत. त्यामुळे या विभागात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

नागरिक बाहेर पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने या भागातील नागरिकांना तातडीने शिधा पाकिटे वाटण्याची व्यवस्था करावी अशी सुचना खासदार गिरीश बापट यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.