Pune : ’26/11’सारख्या घटनांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा – भानुप्रताप बर्गे

पोलीस मित्र संघटनेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा

एमपीसी न्यूज – अलीकडच्या मुलांना 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद विजय साळसकर, अशोक कामठे, हेमंत करकरे यांच्यासह इतर हुतात्म्यांची माहिती नसते. सीमेवर जवान आणि देशांतर्गत सुरक्षेसाठी पोलीस आपले प्राण पणाला लावत असतात. अशा पोलिसांचा, जवानांचा पराक्रम नव्या पिढीला समजावा, यासाठी 26/11 सारख्या ऐतिहासिक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हायला हवा,असे प्रतिपादन निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

पोलीस मित्र संघटनेच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पोलीस दलात, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या सन्मान सोहळ्यावेळी नगरसेविका नीलिमा खडे, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, अखिल भारतीय कथ्थक तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कपोते, चंद्रशेखर कपोते, संदीप नकाते, नितीन घटकोळ, मिलिंद चौधरी, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.

  • यावेळी भानुप्रताप बर्गे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्ष होताहेत. मात्र, आपल्याला आपत्ती काळातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. कोल्हापूर-सांगली आणि साताऱ्यातील काही पूरग्रस्तांना आपण मदतकार्य पोहोचण्यात कमी पडतो आहोत. देशाच्या प्रगतीसाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. खात्यातील शिस्तीमुळे पोलीस स्वतःचे प्रश्न उघडपणे मांडू शकत नाहीत. अशावेळी पोलिस मित्र संघटना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेली ३२ वर्षे काम करीत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. पोलीस खात्यातील मुलांसाठी सामाजिक कार्य उभारायचे आहे.

त्यानंतर राजेंद्र कपोते म्हणाले, पोलीस अहोरात्र सुरक्षेसाठी तैनात असल्यानेच आपण सण-उत्सव आनंदाने साजरा करतो. राजकीय नेत्यांचे दौरे, सभा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा मेहनत घेते. समाजात पोलिसांचे योगदान मोलाचे आहे. पोलिसांचे अनेक प्रश्न आम्ही पोलिस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. पोलिसांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी असून, पोलीस दलातील कर्मचारी लोकप्रतिनिधी किंवा मंत्री झाल्यास पोलिसांचे प्रश्न सोडवण्यास मदत होऊ शकेल.

  • नीलिमा खाडे म्हणाल्या, दिवसरात्र झटत असणाऱ्या पोलिसांप्रती आपला आदरभाव असला पाहिजे. पूरग्रस्त परिस्थितीमध्येही आपण पोलिसांचे कार्य पाहत आहोत. त्यामुळे पोलीसाचा सत्कार करणे महत्वाचे आहे. त्यातून त्यांना अजून मोठे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचलन केले. आभार संदीप जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.