Pune : माणसाने, माणसाशी माणसासम वागावे- तृतीयपंथीयांची दगडूशेठ गणपतीकडे प्रार्थना

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; तृतीयपंथीयांनी केली आरती

एमपीसी न्यूज – नुकतेच 370 कलम हटले आहे. आता सरकारने आम्हाला लिंग बदल विधेयकावर योग्य तो निर्णय द्यावा. लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये एकोपा, प्रेम निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. त्याप्रमाणे समाजात एकोपा व माणुसकी जपावी, याकरीता आम्ही देखील प्रयत्न करीत आहोत. मात्र, आपल्या समाजात माणसाने माणसाशी माणसासम् वागायला हवे, अशी प्रार्थना करीत तृतीयपंथीयांनी गणरायाची आरती केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात निर्भया (आनंदी जीवन) पुणे या संस्थेतर्फे तृतीयपंथीयांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थेच्या चांदनी गोरे, सोनाली दळवी, दगडूशेठ ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, राजू पायमोडे, मंगेश सूर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. विविधांगी अलंकारांनी सजून आपल्या पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तृतीयपंथीयांनी दगडूशेठ गणपतीचे मनोभावे दर्शन घेत अभिषेकासह आरतीही केली.

गुरुवारी सकाळी उत्सवमंडपात धार्मिक विधींतर्गत अग्निहोत्र देखील झाले. तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, भाजपा पुणे शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, ब-याच ठिकाणी महापूर आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सरकार आणि महापालिका अनेक ठिकाणी मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काही ठिकाणी माणसाचे प्रयत्नही अपुरे ठरतात. विघ्नहर्ता म्हणून आपण श्रीगणेशाची पूजा करतो. त्यामुळे अशा संकटांवर मात करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.