Pune : ‘दगडूशेठ’च्या संगीत महोत्सवात दिग्गजांचे सादरीकरण अनुभवण्याची पर्वणी

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे (Pune) गणपती मंदिराच्या 39 व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान म्हणजेच दि. 22 ते 30 मार्च पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

संगीत महोत्सवाचे उद्घाटन पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवळकर यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात शास्त्रीय गायन, कथक नृत्य, व्हायोलीन वादन, लोकगीते, भारुड, पोवाडे, नाटयगायनाचा देखील समावेश आहे. संगीत महोत्सवाची सुरुवात बुधवार, दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता सुश्राव्य साधना या प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायन कार्यक्रमाने होणार आहे. त्यापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला सकाळी 9 वाजता मंदिरामध्ये परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते गुढीपूजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

संगीत महोत्सवात गुरुवार, दिनांक 23 मार्च रोजी शाहीर नंदेश उमप व सहका-यांचा नंदेश उमप रजनी हा कार्यक्रम, शुक्रवार, दिनांक 24 मार्च रोजी ज्येष्ठ गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा बाबूजी आणि मी हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दिनांक 25 मार्च रोजी अनादी-अनंत, श्री गणेश हा प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे.

अनुभूती हा गायक ॠषिकेश रानडे, धवल चांदवडकर, शरयू दाते यांचा गायनाचा कार्यक्रम रविवार, दिनांक 26 मार्च रोजी होणार आहे. तर, प्रख्यात व्हायोलीन वादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर व रागिणी शंकर यांचा परंपरा हा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम सोमवार, दिनांक 27 मार्च रोजी पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. मंगळवार, दिनांक 28 मार्च रोजी गायक अजित परब, योगिता गोडबोले, संदीप उबाळे, संज्योती जगदाळे यांचा स्वर गुंजारव हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री हे करणार आहेत.

Talegaon : गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत – संजय आवटे

महोत्सवात बुधवार, दिनांक 29 मार्च रोजी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे शास्त्रीय गायन ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्यांना सुयोग कुंडलकर हार्मोनियमवर तर, भरत कामत हे तबल्यावर साथ देणार आहेत. महोत्सवाचा समारोप गुरुवार, दिनांक 30 मार्च रोजी प्रख्यात गायक पं.ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या स्वरमैफलीने होणार आहे. यावेळी गायिका मधुरा दातार व विभावरी आपटे या देखील सादरीकरण करणार आहेत. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.