Pune : मिळकतकरावरील सवलतीच्या मुदतीत जूनपर्यंत वाढ : हेमंत रासने

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आणि अन्य बाबी लक्षात घेऊन वार्षिक मिळकतकरावर मिळणाऱ्या सवलतीची मुदत जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

दरवर्षी मिळकत कर एप्रिल, मे या महिन्यांमध्ये भरल्यास त्यावर पाच ते दहा टक्के सवलत करदात्यांना मिळते. यंदा एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे करदात्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन करावरील सवलतीची मुदत जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीतही घेण्यात आला आहे.

पुणे महापालिका हद्दीत सुमारे दहा लाख मिळकतधारक आहेत. महापालिका भवन, महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये येथे मिळकत कर भरण्यासाठी सोय आहे. काही सहकारी बँकांमध्येही महापालिकेचा मिळकत कर भरण्याची सेवा उपलब्ध आहे. तसेच ऑनलाइन सेवाही उपलब्ध आहे.

अनेक करदाते अशा सेवांमार्फत महापालिकेचा मिळकत कर भरतात. एप्रिल, मे महिन्यात मिळकत कर भरल्यास त्यावर पाच ते दहा टक्के सूट मिळते. त्यामुळे दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मिळकत कराचा भरणा मोठ्या प्रमाणात होतो. यंदा लॉकडाऊनमुळे कर भरणा प्रमाण अत्यल्प आहे. पालिकेत कर्मचारी कमी असल्यामुळे कराची चलने सगळ्या मिळकतधारकांना पाठविणेही शक्य झालेले नाही. काही करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरणा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.