Pune: पंचवीस लाखांची खंडणी मगितल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला 25 लाखांची खंडणी मगितल्याप्रकरणी माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मानकर यांच्यासह तिघांवर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय रामेश्वर अग्रवाल (वय 52, रा.माहीम, मुंबई) (दि 27) यांनी फिर्याद दिली आहे. दीपक माधवराव मानकर यांच्यासह सुधाकर रामदयाल बेहेडे (रा. कोथरूड), निशांत सुधाकर बेहेडे (रा.कोथरूड), अमित थेपडे (रा. एरंडवणे), गुरूनामसिंग भटियानी (रा. वडगावशेरी), बच्चूसिंग गुरूमुखसिंग टाक (रा. हडपसर), प्रदीप दत्तात्रय लांडगे (रा. भोसलेनगर) व आणखी 2-3 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी अजय रामेश्वर अग्रवाल यांनी 1995 ते 2017 या काळात सुधाकर बेहेडे यांच्यासोबत हडपसर येथे सुमारे 2 एकरचा रेसिडेन्सीयल आणि कमर्शियल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट एकत्रितरित्या भागीदारीत घेतला. दरम्यान, सुधाकर बेहेडे याने अग्रवाल यांच्यासोबत करार करून त्यांच्याकडून 25 लाख घेऊन हडपसर येथील प्रकल्पातील दुकाने, फ्लॅट हे अग्रवाल यांच्या लेखी संमतीशिवाय विकून टाकले. त्या प्रकल्पात फिर्यादी अग्रवाल व त्यांच्या कंपनीने 2 कोटीपेक्षा अधिक रक्कम गुंतवली होती. फिर्यादी यांच्या कंपनीसोबत भागीदारी अस्तित्वात असताना देखील बेहडे यांनी राजेंद्र कुंभार यांच्यासोबत भागीदारी करून फिर्यादीच्या संमतीशिवाय तो प्रकल्प काही इसमांना विकला.

आरोपींनी अग्रवाल यांना वेळोवेळी शिवीगाळ करून जबरदस्तीने गाडीत घालून दीपक मानकर याच्या ऑफिसमध्ये नेले आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवून कोऱ्या आणि लिखित पेपरवर आणि स्टॅम्पवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या आणि 25 लाखांची खंडणी मागितली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.