Pune: विद्यापीठाने महाविद्यालयांना 11 दिवस सुट्टी जाहीर केल्याची ‘फेक पोस्ट’ व्हायरल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना 20 ते 30 मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे, अशा अशयाची एक ‘फेक पोस्ट’ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, तथापि, संबंधित संदेश चुकीचा असून अशी कोणतीही सुट्टी विद्यापीठाने जाहीर केली नसल्याने विद्यापीठाच्या कुलसचिवांनी स्पष्ट केले आहे.  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात सुट्टीबाबतची पोस्ट हा कोणीतरी केलेला खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदेशीर कारवाई करणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे, अशा आशयाचा संदेश असलेले निवेदन सध्या सोशल मीडियावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा संदेश चुकीचा आहे. संबंधित निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले नाही. ते कोणीतरी खोडसाळपणे तयार केले आहे. या प्रकारामुळे समाजात अफवा व घबराट पसरण्याचा धोका आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करणात येणार आहे, असे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी निवेदनात नमूद केले आहे.

पुण्यात काल कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या परिस्थितीचा गैरफायदा उठवीत महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे, अशा अशयाचा खोटा मेसेज कोणी तरी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. कोरोनाच्या साथीची तीव्रता आता जास्त असताना नऊ  दिवसांनंतर सुट्टी जाहीर करण्याचे प्रयोजन काय, अशी शंका आल्याने काहीजणांनी विद्यापीठाशी संपर्क साधला असता, ही पोस्ट ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.