Pune : लॉकडाऊन कालावधीत शेतीची कामे सुरु ठेवावीत – जिल्हाधिकारी 

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन कालावधीत शेतीची कामे सुरळीत पार पाडता येतील. शेतीच्या कामांना जमावबंदीच्या आदेशातून सूट देण्यात आली आहे, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे. पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असून या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यामधून जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या गृहसचिवांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना उद्देशून दिलेल्या अर्धशासकीय पत्रात लॉकडाऊनच्या कालावधीत कृषी विषयक कामांना ग्रामीण भागात सूट देण्यात यावी, असे म्हटले आहे.

त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत शेती अनुषंगीक शेतकरी व शेतमजुरांची शेतीविषयक कामे, शेती/ कृषी उत्पादनाची खरेदी विषयक कामे, मंडी/बाजार समित्यांची‍ कृषी विषयक कामे, पीक पेरणी संबंधाने यंत्राच्या हालचाली, कृषी यंत्राच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कामे, दुकाने इत्यादी कामे सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधीत यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच वरील कामे पार पाडताना कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश पाळावेत आणि आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग प्रतिबंध  कायदा तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राम यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.