Pune : शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देणार

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणजे करणारच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले. सध्या आम्ही 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती मागितली आहे. तज्ञ कमिटीची स्थापना करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच, येत्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठवाड्यात आपल्या इन्स्टिट्यूटला जागा देण्यासाठी फाईल मंजूर करणार असल्याचेही ते म्हणाले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी (दि. 25) मांजरी येथे सकाळी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सहकार मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, रोहित पवार उपस्थित होते. शिवाजीराव देशमुख यांनी सर्वसाधारण सभेचे कामकाज समजून सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ‘आयसीयु’त गेल्याचे पंतप्रधानांचे माजी सल्लागारांनी सांगितले. आम्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर, कमीत कमी आमदारांत चमत्कार कसा करून दाखविता येतो, तो पवार यांनी करून दाखविल्याची कोपरखळीही त्यांनी भाजपला मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.