Pune: महामार्गांवरील टोलनाक्यांची फास्टॅग सक्ती तूर्तास टळली

एमपीसी न्यूज – आजपासून (दि. 15 डिसेंबर) राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्टॅग योजना लागू होणार होती, मात्र यामुळे विविध टोलनाक्यांवर होणारी संभाव्य मोठ्या प्रमाणावरील कोंडी टाळण्यासाठी व वाहनचालकांना फास्टॅग घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून आता टाेलनाक्यांवर एकूण २५ टक्के मार्गिकांवर येत्या १५ जानेवारी २०२० पर्यंत फास्टॅग पद्धतीने आणि रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाईल. 

यापूर्वी टोलनाक्यांवरील एकूण मार्गिकांपैकी फक्त एका मार्गिकेतूनच रोख शुल्क तेही दुप्पट स्वीकारले जाणार होते. मात्र या गोष्टीला सर्वसामान्यांकडून प्रचंड प्रमाणात विरोध झाला होता. तरीही सरकार ही योजना रेटू पाहत होते. मात्र नाताळ, ३१ डिसेंबर आदींमुळे टोलनाक्यांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन सर्वसामान्यांवर येणारे हे गंडांतर पुढे ढकलले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनचालकांना रांगेत थांबावे लागत होते. त्यामुळे अधिक वेळ जात होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला.

सध्या टोलनाक्यांवर एका मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना, तर उर्वरित मार्गिकेतून जाताना रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. हि योजना 15 डिसेंबरपासून अंमलात येणार होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.