Pune : ‘लॉकडाऊन’ला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचा विरोध

Pune: Federation of Trade Associations opposes lockdown : दुकाने बंद ठेवणे covid-19 वर उपाय नाही

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणेतर्फे विरोध करण्यात आला आहे. दुकाने बंद ठेवणे covid-19 वर उपाय नसल्याचे सांगत दुकाने बंद ठेवल्याने कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत,असे मागील तीन महिन्याच्या अनुभवावरून लक्षात आले आहे.लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीतीने असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी व्यक्त केली आहे.

दि. 13 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यास व्यापारात फार मोठी हानी होणार आहे. त्याचबरोबर आर्थिक, मानसिक, शारीरिक, नुकसान कधीही भरून येणार नाही.

व्यापाऱ्यांमध्ये मानसिक त्रास वाढून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच आर्थिक आणि मानसिक वैफल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती  असोसिएशनने व्यक्त केली आहे.

त्याउलट पुणे शहरातील सर्व दुकाने सातही दिवस उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी. व्यवसायाची वेळ सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत असावी. जे व्यावसायिक सरकारने अथवा पुणे मनपाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यावसायिकाने दुकानांत हॅन्ड सॅनिटायजर, मास्क, टेम्प्रेचर मीटर, हॅन्डग्लोज, सोशल डिस्टनसिंग केल्याबद्दल प्रत्येक असोसिएशनच्या लेटर हेडवर अंडर टेकिंग करून पुणे महापालिकेकडे दाखल करण्याची सक्ती करावी.

त्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची व्यवस्था करावी, असे असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांनी म्हटले आहे.

यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.