Pune : ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित 18 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा आज प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे पार पडला. यावेळी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने यावर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ‘अ सन’ या ‘ट्युनिशियन चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला. महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा केली.

रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाने परिक्षकांची पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमेटोग्राफी (छायाचित्रण) व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, प्रसिद्ध ध्वनि दिग्दर्शक व ध्वनी डिझायनर बिश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले परीक्षक आदि उपस्थित होते. पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे 18 वे वर्ष होते. ज्यामध्ये 60 देशांतील 191 हून अधिक चित्रपटांचा आस्वाद पुण्यातील चित्रपट रसिकांना घेता आला.

समीर विध्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार पटकाविला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही दिग्दर्शक व 50 टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.