Pune : अखेर पावसाळापूर्व कामांना मुहूर्त ; नालेसफाईच्या कामांना सुरुवात

विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली होती मागणी

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यात उतरली असताना नालेसफाई आणि पावसाळा पूर्वीची कामे कधी होणार, असा सवाल विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा तातडीने जागी झाली. महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्वी करावयाची कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी आलेल्या अवकाळी पावसाने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. यावेळी काही भागात पूर परिस्थिती निर्मण होऊन त्यात कित्येक नागरिकांचा बळीही गेला होता. शिवाय नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले होते.

दीपाली धुमाळ यांच्या मागणीनुसार महापालिकेने सध्या आंबिल ओढय़ाचे खोलीकरण आणि राडारोडा काढण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी ही नालेसफाईची कामे वादग्रस्त ठरतात. ही कामे थातुरमातुर होत असल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचत असल्याचा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यामुळे नालेसफाईची कामे मुख्य खात्याकडूनच करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातून वाहणाऱ्या आंबील ओढ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे शहरात साधारण १५८ किलोमीटर लांबीचे नाले असून, नालेसफाई, ओढे-नाल्यातील राडारोडा उचलणे, आशा विविध कामांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात आठ कोटी रुपयांची तरतूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.