Pune: राजकीय षडयंत्रातून माझ्यावर गुन्हा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार- संजय काकडे

Pune: FIR against me for political conspiracy says Sanjay Kakade माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी मला विचारणे गरजेचे होते. कोणतीही कल्पना न देता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – राजकीय षडयंत्रातून माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेव्हणा युवराज ढमाले याने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे आपल्याला वाईट वाटले. माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी मला विचारणे गरजेचे होते. कोणतीही कल्पना न देता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरून संजय काकडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय काकडे यांनी मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. पोलिसांनी संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मागील 3 वर्षात मी ढमाले याला केवळ दोनदाच भेटलो. एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. पण, हे एक राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही काकडे यांनी केला आहे. आपण लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यातून सत्य परिस्थिती समोर येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.