Pune : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना फोनवर धमकविल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना फोनवर धमकविल्याप्रकरणी अनोख्या पद्धतीने आंदोलन करणारे आणि यामुळे प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.याबाबत देसाई यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दि.३१ ऑक्टोबर 2019 रोजी तृप्ती देसाईंनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे बच्चू कडू शिवसेना आणि बिजेपी विरोधात आंदोलन का करत नाहीत. विदर्भात शेतकरी अडचणीत आहे.

अशा मजकुराची पोस्ट टाकली होती.यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत बदनामीकारक टिप्पणी करून मानसिक त्रास होईल,  अशा कमेंट्स केल्या. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली.

यानंतर तृप्ती देसाई आणि बच्चू कडू यांचे याबाबत फोनवर बोलणे झाले. त्यामध्ये मी बच्चू कडू बोलतोय, तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका, स्वतःला मोठे समजू नका, शहाणपणा करू नका, अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याबाबत हा गुन्हा दाखल केला असल्याचे देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या रूढी आणि परंपरा याविरुद्ध तसेच स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी अनेक आंदोलने केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.