Pune : अर्णब गोस्वामी विरोधात पुण्यातील सर्व पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल – मोहन जोशी

एमपीसी न्यूज ;  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात हीन पातळीवरील शेरेबाजी आणि विधाने केल्याबद्दल  तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याबद्दल रिपब्लिकन टीव्ही चॅनेलचे संपादक अर्णब रंजन गोस्वामी यांच्या विरोधात शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल केले असल्याची  माहिती काँग्रेसचे  प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.

मोहन जोशी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय पक्षाचे शहर उपाध्यक्ष विरेंद्र किराड, उपाध्यक्ष मनिष आनंद, उपाध्यक्ष मंजूर शेख, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सोनाली मारणे, चैतन्य पुरंदरे, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके, अभिजित रोकडे, विकास लांडगे, प्रदेश ओबीसी आघाडीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे, अजीज सय्यद, प्रविण करपे, गौरव बोराडे, सादीक रोकडे, सुजित यादव, संजय मोरे, नरेंद्र व्यवहारे, विकास टिंगरे, शैलेंद्र नलावडे, किशोर मारणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल केले आहेत.

रिपब्लिकन टिव्हीवर  २१ एप्रिल रोजी पालघर मॉब लिंचिंग यावरील चर्चेत बोलताना गोस्वामी यांनी काँग्रेस पक्षाच्या  आध्यक्षा  सोनिया  गांधी यांच्या विरोधात अत्यंत हीन पातळीवरील विधाने आणि शेरेबाजी केली.  तसेच बहुसंख्य हिंदूंची मते अल्पसंख्यांकांच्या विषयी कलुषित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ११७, १२० बी, १५३, १५३ए, २९५ए, २९८, ५००, ५०४, ५०५, ५०६ आणि आयटी अॅक्ट सेक्शन ६६ए नुसार एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरची तातडीने दखल घेऊन अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली  आहे.

पालघर प्रकरणाला कुठल्याही पुराव्याशिवाय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न गोस्वामी यांनी केला आहे. त्यांनी सदैव अनैतिक पत्रकारिता केली असल्याचा आरोपही एफआयआरमध्ये केला असल्याचे जोशी यांनी सागितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.