Pune : अग्निशमन विभागाच्या जवानाला मारहाण; पिता-पुत्रविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – आग लागली असल्याने अग्निशमन विभागाचे जवान आग विझवण्याचे काम करत होते. त्यावेळी पिता-पुत्राने तिथे येऊन अग्निशमन विभागाच्या जवानांना मज्जाव करत लिडिंग फायरमनला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना आज (बुधवारी) पहाटे साडेबाराच्या सुमारास टिंगरे नगर येथे घडली.

सुनील सोपान देवकर (वय 53, रा. नवी खडकी, येरवडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार राजाराम बबन टिंगरे (वय 57), सूरज राजाराम टिंगरे (दोघे रा. मुंजाबावस्ती, धानोरी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे अग्निशमन विभागात लिडिंग फायरमन म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते येरवडा अग्निशमन विभागात रात्रपाळीवर हजर होते. त्यावेळी रात्री 11 वाजता विमाननगर येथील कोठारे शोरूम जवळ आग लागल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सुनील त्यांच्या पथकासह एक बंब घेऊन पोहोचले.

त्या ठिकाणची आग विझवून ते परत येत असताना टिंगरे नगर येथे एका ओढ्यामध्ये कच-याला आग लागली होती. ती आग विझवत असताना आरोपी राजाराम तिथे आले. त्यांनी सुनील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यासाठी आरोपीचा मुलगा सुरज याने देखील मदत केली. यावरून पिता-पुत्रविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.