Pune : कोंढवा येथे फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज- फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागून गोडाऊनमधील सर्व फर्निचर जळून खाक झाले. या आगीची झळ शेजारच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रसामुग्री असलेल्या गोडाऊनला देखील बसली. मात्र अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे शेजारच्या लुब्रीकॅन्ट ऑइलच्या गोडाऊनला आगीपासून दूर ठेवण्यात यश आल्यामुळे मोठी हानी टळली. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कोंढव्याजवळ धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

कोंढवा अग्निशमन दलाचे स्टेशन प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा- खडीमाशीन चौक ते देवाची उरळी रस्त्यावर धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे वेगवेगळ्या सामानाची गोडाऊन आहेत. या गोडाऊनपैकी फर्निचरच्या एका गोडाऊनला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच कोंढवा अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी रवाना झाली.

सदर गोडाऊनला लागूनच लुब्रीकॅन्ट ऑइलचे गोडाऊन असल्यामुळे त्वरित या गोडाऊनला आगीपासून वाचवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. दरम्यान, आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे आणखी फायर गाडयांना पाचारण करण्यात आले. कात्रज, हडपसर येथून प्रत्येकी एक गाडी तर भवानीपेठ मुख्य अग्निशमन केंद्रातून दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. ८ वाजून २० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये गोडाऊनमधील फर्निचर तसेच लोखंडी अँगल टाकून केलेला पोटमाळा देखील जाळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या गोडाऊनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.

कोंढवा अग्निशमन दलाचे स्टेशन प्रमुख प्रकाश गोरे यांच्या नेतृत्वाखाली फायरमन अजितकुमार शिंदे, रफिक शेख, अर्जुन यादव, सत्यम चौखंडे, आकाश पवार, मनोज भारती, चालक समीर तडवी तसेच कात्रज अग्निशमन केंद्राचे प्रमुख संजय रामटेके, हडपसर अग्निशमन केंद्राचे प्रमुख शिवाजी सावंत यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.