Pune : रिक्षाचालकाच्या समयसूचकतेमुळे आगीची दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज- गॅस सिलेंडरच्या रबरी नळीमधून गॅस गळती होऊन आग लागली असता शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाने समयसूचकता दाखवून आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक तरुणी किरकोळ जखमी झाली. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास दांडेकरपूल झोपडपट्टीमध्ये घडली.

दांडेकरपूल झोपडपट्टी स. न. स नं-132 येथील एका घरामध्ये ज्योती यशवंत चव्हाण (वय वर्षे 21) हे तरुणी स्वयंपाक करीत असताना, रबरी ट्युबजवळ गॅसगळती होऊन गॅसने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संजय कसबे यांनी समयसूचकता दाखवित त्वरित त्यांच्या रिक्षात असणारा छोटा फायर एक्स्टींगविशर्स आणून त्याचा योग्य वापर करून आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संजय कसबे हे फायरमन प्रज्वल कसबे यांचे चुलते आहेत.

दरम्यान, एरंडवणा अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहचली. जवानांनी सिलेंडर शेगडीसहीत बाहेर काढून चेक केला. सिलेंडर लिकेज नव्हता, रबरी ट्युब निकामी झाल्याने दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले. या घटनेत ज्योती चव्हाण हिच्या पायाला किरकोळ स्वरूपात झळ पोचल्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आले. कसबे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेचे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.