Pune : औषधाच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांची औषधे भस्मसात

एमपीसी न्यूज- पुण्यात सदाशिव पेठेतील जीवन फार्मास्युटिकल्स् डिस्ट्रिब्युटर्स या दुमजली दुकानाला आग लागून लाखो रुपयांची औषधे भस्मसात झाली. ही घटना आज पहाटे 4 वाजता घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन अधिकारी भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन फार्मास्युटिकल्स् डिस्ट्रिब्युटर्स या होलसेल औषध विक्री करणाऱ्या दुमजली दुकानाला आज पहाटे चारच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच कसाब पेठ, भवानी पेठ आणि एरंडवणे केंद्रातील अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, दोन टँकर घटनास्थळी रवाना झाले.

आगीची तीव्रता लक्षात घेता या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रहिवाशांना त्वरित बाहेर काढण्यात आणून संपूर्ण इमारत मोकळी करण्यात आली. सुमारे तासाभरात पहाटे 5 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सकाळी साडेसात वाजता संपूर्ण आग आटोक्यात आली. या आगीमध्ये दुकानातील लाकडी फर्निचर, महागडी औषधे जळून भस्मसात झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.