रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune : देवाची उरळी येथे साडीच्या दुकानाला आग लागून पाच कामगारांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज- साडीच्या दुमजली शोरूमला आग लागून शोरूममध्ये झोपलेल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडेचार वाजता देवाची उरळी येथे असलेल्या राजयोग साडी सेंटर या दुकानात घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब आणि दहा खासगी टँकरच्या साहायाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मृत कामगारांपैकी पाचही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या आगीच्या धुरात गुदमरून या कामगारांचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

राकेश चौधरी (वय 24), राकेश मेघवाल (वय 20), धर्माराम बडियासर (वय 24), सूरज शर्मा (वय 25), गोपाल चांडक (वय 23) अशी मृत कामगारांची नावे आहेत. हे सर्वजण परराज्यातील आहेत.

देवाची उरळी येथे अनेक साडयांची दुकाने आहेत. यापैकी राजयोग साडी सेंटर या दुमजली दुकानाच्या तळमजल्याला आज पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. रात्री नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर बाहेरून कुलूप लावून बंद करून दुकानाचे व्यवस्थापक निघून गेले. त्यावेळी नेहमीप्रमाणे पाच कामगार झोपले होते. दुकानाच्या तळ मजल्यावर आग लागल्यामुळे वरच्या मजल्यावर झोपलेल्या कामगारांना उशिरा समजले. त्यांनी त्वरित मोबाइलवरून दुकान मालकाशी संपर्क करून शटर उघडून सुटका करण्यास सांगितले. परंतु आग इतकी भीषण होती की घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र प्रचंड धुरामुळे त्यांना आत जाता आले नाही.

अखेर जेसीबीच्या साहाय्याने दुकानाच्या मागची भिंत फोडून आत प्रवेश केला. मात्र तोपर्यंत पाचही कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत दुकानातील साड्या, तयार कपडे असा एकूण सुमारे एक कोटी रुपयांचा माल भस्मसात झाला.

 

spot_img
Latest news
Related news