Pune Fire Update : कारखान्याच्या आगीत मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील पिरंगुटजवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 7) दुपारी घडली. या घटनेत सायंकाळपर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारखान्याच्या आगीत मृत्यू झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

‘महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना.’ या शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

मुळशी तालुक्यातील पिरंगुटजवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस ही रासायनिक कंपनी आहे. या कंपनीत सॅनिटायझर बनवले जाते. कंपनीत सोमवारी सुमारे 37 कामगार काम करत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. काम करत असलेल्या 37 कामगारांपैकी 17 कामगार बेपत्ता झाले.

अग्निशमन विभागाला माहिती मिळताच पीएमआरडीएचे सहा आणि एमआयडीसीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. दरम्यान 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही सर्व ऑपरेशन सुरू आहे.

कंपनीत अडकलेल्या कामगारांमध्ये महिला कामगारांची संख्या अधिक आहे. आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.