Pune Fire Update : आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

उरवडे येथे आग लागलेल्या रासायनिक कंपनीची गृहमंत्र्यांकडून पाहणी

एमपीसीन्यूज : “मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, व आगीच्या चौकशी अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची गृहमंत्री वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खा. सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडून या दुर्देवी घटनेची माहिती घेतली.

यावेळी वळसे पाटील म्हणाले, या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली असून आगीचे कारण, आगीला जबाबदार कोण तसेच याबाबतची कारवाई अहवाल आल्यानंतर होईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत, यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.