Pune : पुण्यात सराफ व्यवसायिकावर गोळीबार, कोंढवा पोलीस घटनास्थळी (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज –  ज्वेलर्सच्या दूकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली.

आज सकाळपासूनची पूण्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. अमृत परिहार(वय 25, रा.मूळगाव राजस्थान) असे गोळीबारात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्सचे या दुकानाचे मालक दुकानात नव्हते ते काही कारणांमुळे बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या दुकानात अमृत हा गेल्या चार वर्षांपासून कामास असून तो दुकानात एकटाच होता. नेहमीप्रमाणे तो दुकानात आपले काम करत असताना आज अचानक दुपारी चारजण तेथे आले आणि त्यांचे अमृतशी काही बोलणे झाले. दरम्यान चार जणांपैकी तोंडाला बांधलेल्या एकाने बंदूकीतील गोळी अमृतवर झाडली आणि चारही आरोपी तेथून पसार झाले. ते चारही जण दोन दूचाकींवर आले होते व हल्ल्यानंतर ते कात्रजच्या दिशेने पळून गेले. झालेल्या गोळीबारात अमृतच्या पोटाला गोळी लागल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी भारती हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

गोळीबारात जखमी असलेल्या अमृतच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.