Pune: राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्ण दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज!

एमपीसी न्यूज – राज्यातील पहिले कोरोनाबाधित म्हणून नोंद झालेले दाम्पत्य उपचारांनंतर पूर्ण बरे झाले आहे. कोरोना निदानाची दुसरी चाचणीही ‘निगेटीव्ह’ निघाल्यामुळे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातून आज (बुधवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काही वेळातच हे कोरोनामुक्त दाम्पत्य त्यांच्या घरी परतले आहे.

दुबईला जाऊन आलेले हे दाम्पत्य काही दिवसानंतर त्रास होऊ लागल्याने होळीच्या दिवशी नायडू रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या घशातील द्राव चाचणीसाठी पाठविले असता त्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. राज्यातील हे पहिले दोन कोरोना रुग्ण असल्याने मोठी खळबळ उडाली.

रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 14 दिवस उपचार केल्यानंतर ते बरे झाले आहेत. 24 तासांच्या अंतराने त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. दोन्ही चाचण्यांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला. त्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. पाडव्याच्या दिवशी या दाम्पत्याला डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून या कोरोनामुक्त दाम्पत्याला निरोप दिला. पोलीस बंदोबस्तात त्यांची रुग्णवाहिका घराच्या दिशेने रवाना झाली.

खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरी आणखी 14 दिवस विलगीकरण अवस्थेत राहण्यास सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.