Pune : तिहेरी तलाकचा पुण्यात पहिला गुन्हा दाखल; पतीने पत्नीला पोस्टाने पाठवली तलाक नोटीस

एमपीसी न्यूज – तिहेरी तलाक विधेयक संसदेत मंजूर केल्यानंतर मुस्लिम समाजातून बहुतांश महिला वर्गाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर दीर्घकाळ चर्चा देखील झाली. या सर्व घडामोडीनंतर, पुण्यातील हडपसर भागातील एकाने पत्नीला पोस्टाने तीन वेळा तलाक लिहिलेली नोटिस पाठवली. त्यानंतर या तलाकच्या विरोधात हडपसर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दिली असून पतीवर ट्रिपल तलाक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तिहेरी तलाकविरोधात कायदा संमत झाल्यानंतर पुण्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. जावेद नासिर शेख ( मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद नासिर शेख याचे मागील काही महिन्यापासून पत्नीसोबत भांडण होत होते. सततच्या भांडणामुळे दोघांनीही घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित होते.

दरम्यान, 9 ऑक्टोबर 2019 रोजी जावेद नासिर शेख याने, “मै जावेद नासिर शेख, रिनाज जावेद शेख तुमको तलाक देता हुँ” असे तीन वेळा एका कागदावर लिहिले आणि आपला विवाह संपुष्टात आला, असे लिहिलेली नोटीस पोस्टाने पत्नीला पाठविली. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.