Pune: नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

Pune: Fisheries Minister Aslam Sheikh inspects damaged Bhambarde village

एमपीसी न्यूज- ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची शनिवारी (दि.7) राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी पहाणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घरे, झाडे, विजेच्या पोलचे अतोनात नुकसान झाले.

त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे.

भांबर्डे व नुकसानग्रस्त गावांतील परिस्थितीची पाहणी करुन येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले.

यानंतर बोलताना अस्लम शेख म्हणाले, चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पत्रे व छप्पर उडून गेले आहेत. नुकसानग्रस्त घरांवर लवकरात लवकर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना देखील प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच लोकांना जेवणाच्या साहित्याचा देखील पुरवठा करण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे विजेच्या खांबांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.

शेख यांनी केलेल्या पाहणी दरम्यान मुळशी तालुक्याचे तहसिलदार अभय चव्हाण, मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय उपायुक्त देशपांडे, भांबर्डे गावचे सरपंच, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.